निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील तळेगाव (बोरी) येथील सोनेराव सुगावे व भास्कर सुगावे या शेतक-यांनी त्यांच्या शेतात नुकताच बोअर पाडला असता केवळ १८० फुटावर त्यांना चार इंची पाणी लागले आहे.कोरड्या पाषाणाच्या भागात एवढे पाणी लागल्याने सुगावे यांचा आनंद गगनात मावत नसून लोकनेते विलासराव देशमुख यांनी उभारलेल्या बराजेसमुळे पाणी जमिनीत मुरले जात आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात बोअरला पाणी लागले असल्याची भावना व्यक्त करुन लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याला व दूरदृष्टीला शेतक-यांनी नमन केले आहे.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देत असताना सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत बराजेसची निर्मिती केली. यामुळे शेतक-यांना शेतीसाठी त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले यामुळे सुधारित शेती करण्यास त्यांना मदत होत आहे. पुर्वी निलंगा तालुक्यातील तळेगाव (बोरी) व परिसरातील जमिनीत पाणीसाठा नगण्य होता जमीनीत मृतसाठा असल्याने शेती करणे अवघड जात होते. अशावेळी मुख्यमंत्री म्हणून लोकनेते विलासराव देशमुख यांनी डोंगरगाव येथे बराजची निर्मिती करुन त्या भागातील शेतक-यांना दिलासा दिला.
वीस वर्षांपूर्वी जेव्हा डोंगरगाव बराजची निर्मिती होत होती. तेव्हा प्रकल्पाचे इंजिनिअर शेतक-यांना याचे महत्त्व सांगत असताना काही वर्षांनी तुमच्या भागातील पाणी पातळी नक्की वाढेल असे सांगत होते. तेंव्हा शेतक-यांना विश्वास बसत नव्हता. मात्र बराजचे पाणी जमिनीत मुरल्याने आजघडीला त्याचा फायदा शेतक-यांना व गावक-यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याविषयी शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे व यानिमित्ताने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण केले जात आहे.