मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात खास झाली नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात त्याला निश्चितच चांगली सुरुवात मिळाली, पण तो त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. या खेळीदरम्यान, पुन्हा एकदा किंग कोहलीची पोलखोल झाली. ज्यामुळे तो बराच काळ धावा काढण्यास संघर्ष करत होता. बांगलादेश संघानेही त्याच्या या कमकुवतपणाचा फायदा घेतला आणि विराटची विकेट घेतली.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली संथ खेळी केल्यानंतर आऊट झाला. त्याने ३८ चेंडूंचा सामना केला पण ५७.८९ च्या स्ट्राईक रेटने त्याला फक्त २२ धावा करता आल्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून फक्त एकच चौकार दिसला. विराटला बांगलादेशचा लेग स्पिनर रिशाद हुसेनने बाद केले. डावाच्या २३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराटने बॅकवर्ड पॉइंटवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या दरम्यान तो झेलबाद झाला. ही पहिलीच वेळ नाहीये तो लेग स्पिनर्सविरुद्ध आऊट झाला आहे.
२०२३ च्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने एकूण ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने श्रीलंकेविरुद्ध २ एकदिवसीय सामने, इंग्लंडविरुद्ध २ एकदिवसीय सामने आणि बांगलादेशविरुद्ध १ सामना खेळला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व सामन्यांमध्ये त्याची शिकार फक्त लेग स्पिनर्सने केली आहे. याचा अर्थ तो लेग स्पिनर्सविरुद्ध सतत अपयशी ठरत आहे. या ५ सामन्यांमध्ये त्याने लेग स्पिनर्सविरुद्ध फक्त ३१ धावा केल्या आहेत, जी त्याची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे.