30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रशक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार?

शक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार?

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शक्ती कायद्याची अंमलबजावणी कधी होणार असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुण्यातील घटनेवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट स्थानक परिसरात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशात काँग्रेस आमदार आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेनंतर राज्य सरकारवर कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे म्हणत टीका केली आहे. तसेच, पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

पुण्याचे पोलिस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली, पुढे काय झाले? आता पुण्यात जाऊन हप्तेवसुली करण्यात व्यस्त आहेत का? पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे बस स्थानकातील बसमध्ये जे सामान सापडले त्यावरून बसचा वापर हा महिलांवर अत्याचार करण्यासाठी होत होता का? तिथे सुरक्षा रक्षक असताना बलात्कार घडला. राज्यात गृह खात्याची इभ्रत गेली आहे, अशीही टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
एसटी स्थानकात बलात्कार झाल्यावर आता परिवहन मंत्री बैठक बोलवत आहेत, याचा उपयोग नाही. गुन्हा घडून गेल्यावर सरकार जागे होते. महिला अत्याचाराच्या घटनांत झालेली वाढ, राज्यात कोलमडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत येणा-या अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करू.

सरकारकडून गुन्हेगारांना अभय देण्याचे काम
राज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणा-यांना सुरक्षा दिली जाते. राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरहटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते आरएसएसशी संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते. भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंडं का शिवली गेली’, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR