नवी दिल्ली : भारताचे आजी-माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे देशातील सर्वांत मोठा धार्मिक कार्यक्रम राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात. यासाठी हे दोन्ही खेळाडू अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.
वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
जर या दोघांनीही आमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तर क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारे पहिल्या दोन क्रमांकाचे फलंदाज एकाचवेळी एका धार्मिक कार्यक्रमात दिसतील. अयोध्येत राम मंदिराचे निर्माणकार्य जवळपास पूर्ण झाले असून २२ जानेवारी २०२४ ला प्राणप्रतिष्ठापना करून हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येईल.
पंतप्रधान मोदींसह ८००० पाहुणे होणार सामील
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळपास ८००० पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत. जानेवारी महिन्यात २०२४ मध्ये मंदिर पूर्ण होईल. रामलल्लांच्या मूर्तीच्या उद्घाटन प्रसंगी अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह अनेक लोकांचा समावेश असेल.