34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयस्वच्छ हवेच्या यादीत 'लातूर' देशात पाचव्या क्रमांकावर

स्वच्छ हवेच्या यादीत ‘लातूर’ देशात पाचव्या क्रमांकावर

देशातील 'शिवसागर' येथील हवा सर्वात स्वच्छ

नवी दिल्ली/लातूर : गेले काही दिवस वायूप्रदूषण जगभरातच मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. प्रदूषणामुळे अनेक देशांच्या चिंता वाढत आहे. प्रदूषणाबाबत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालांमधून लातूरकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामने देशाची राजधानी दिल्लीसह १३१ शहरांचे तुलनात्मक निरीक्षण केले. या अहवालानुसार, स्वच्छ हवेच्या बाबतीत ‘लातूर’ देशात पाचव्या क्रमांकावर आहे.

पर्यावरण आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम हवा महाराष्ट्रातील लातूरची होती. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, येथील हवेतील पीएम१० चे प्रमाण वर्षभर सरासरी ५३ मायक्रोग्रॅम घनमीटरपेक्षा जास्त नव्हते. तर आसाममधील शिवसागर येथील हवा देशातील सर्वोत्तम हवा म्हणजेच सर्वात स्वच्छ हवा होती. विषारी कण असलेले पीएम १० चे प्रमाण येथील हवेत फक्त ४२ असल्याचे आढळून आले.

हिमाचल प्रदेशातील सुंदर नगरची हवा देशात सर्वात स्वच्छ (४६) दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिमाचल प्रदेशातील परवानू आणि तमिळनाडूमधील त्रिची येथे वर्षभर हवेची गुणवत्ता चांगली होती. येथे पीएम१० ची सरासरी एकाग्रता ४७ मायक्रोग्रॅम क्यूबिक मीटर नोंदवली गेली. तर संपूर्ण देशात, चौथ्या क्रमांकावर असलेल्या आसाममधील आणखी एका शहर सिलचरच्या हवेत पीएम१० चे प्रमाण ४९ असल्याचे आढळून आले.

उत्तर प्रदेशच्या बनारस शहरात हवेत कमालीची सुधारणा झाली आहे. संपूर्ण राज्यात येथे उत्तम वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेशातील १७ शहरांमधील हवेच्या गुणवत्तेच्या डेटामध्ये मेरठ आणि झाशी शहरांमध्ये विषारी कण कमी होण्याऐवजी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर इतर १५ शहरांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण प्रदूषणाच्या छायेत आली आहे. प्रदूषित हवा आपल्या शरीरात असंख्य विषारी कण घेऊन जात असते, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांसोबत अन्य आजाराने मानवी शरीर ग्रासण्याची शक्यता निर्माण होते.

दक्षिण भारतात सर्वात स्वच्छ हवा
अहवालानुसार, दक्षिण भारतातील शहरांमध्ये उत्तर भारताच्या तुलनेत सर्वात स्वच्छ आणि कमी विषारी हवा आहे. बेंगळुरूच्या हवेत पीएम१० चे प्रमाण ६८ मायक्रो क्यूबिक मीटर आहे. तर कर्नाटकातील दावणगेरेमध्ये ही टक्केवारी ६१ आहे.

फरिदाबादमध्ये सर्वात विषारी हवा
देशभरातील सर्वात विषारी हवा एनसीआरच्या फरिदाबादमध्ये वर्षभरात मोजली गेली आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीच्या हवेत पीएम१० ची सरासरी वार्षिक एकाग्रता २०९ इतकी नोंदवली गेली. तर २०१७ मध्ये ही टक्केवारी २४१ मायक्रोग्रॅम घनमीटर होती. दिल्लीत हा आकडा पूर्वीपेक्षा चांगला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR