मुंबई : मुंबईत अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. पण फक्त मुंबईत होर्डिंग्ज प्रश्न नाही तर राज्यातही अनधिकृत होर्डिंग्ज वाढलेले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जमुळे अपघात झाल्यास सरकार याची जबाबदारी घेणार का? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केला आहे.
राज्यात ९०२६ ठिकाणी होर्डिंगचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात एकूण १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आली आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. राज्यात एकूण ९०२६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही.राज्यात १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहे. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूणच अनधिकृत होर्डिंग्ज बाबत दरवर्षी राज्यात ऑडिट केले जाणार असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावर्षीचे होर्डींग्जचे ऑडिट अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर सुरू केले जाईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी सभागृहाला दिली.