नाशिक : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर गावात ही घटना घडली आहे. श्याम मामराज राठोड असे या चिमुरड्याचे नाव आहे. कुत्र्यांनी अक्षरश: श्यामचे लचके तोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम सायंकाळच्या सुमारास शाळेतून घरी परतला. त्यावेळी त्याची आई शेतात कामाला गेली होती. श्याम नेहमीप्रमाणे शेतात आईकडे जाण्यास निघाला होता. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. जवळपास त्याला मदत करणारे कुणीही नव्हते. तो मदतीसाठी ओरडत राहिला मात्र त्याला मदतच मिळाली नाही.
सकाळी हसत-खेळत शाळेत गेलेल्या चिमुकल्या श्यामचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला श्यामचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला. त्याच्या आईने तर अक्षरश: टाहो फोडल्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले.