निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील मसलगा येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर भेग पडल्याने प्रकल्पातील ५० टक्के पाणी सोडून देण्यात आले. आता या प्रकल्पात अत्यल्प पाणी शिल्लक राहिले आहे. प्रकल्पाची लवकर दुरुस्ती होऊन पावसाळ्यापुर्वी पाणी थांबण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र अद्यापही दुरुस्तीची संचिका प्रशासकीय लालफितीत अडकल्याने प्रकल्पाची दुरुस्ती कधी होईल, या अनुषंगाने शेतक-यांमधून संतापही व्यक्त केला जात आहे.
निलंगा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणा-या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेग पडली. त्यात एक बाजू दबत चालल्याची बाब येथील शेतक-यांनी जलसंधारण विभागाच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणुन दिली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे झाली. प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला गेला. हा प्रकल्प फुटेल म्हणून मसलगासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
छत्रपती संभाजीनगर येथून भूगर्भशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या पथकाने प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाचा पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर केला. धोका टाळण्यासाठी पाण्याचा विसर्ग ४५ ते ५० टक्के इतका केला. सधाा केवळ दहा ते बारा टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे. अद्यापही प्रशासकीय यंत्रणेच्या घोळामध्ये काम सुरु होत नाही. येत्या दोन महिन्यांनंतर पावसाळा सुर होईल. त्यापुर्वी या प्रकल्पाच्या दुुरुस्तीचे काम पुर्ण होणे अपेक्षीत आहे. पावसाळ्यापुर्वी दुरुस्तीचे काम नाही झाल्यास पुढील वर्षासाठी पुन्हा प्रकल्प कोरडा राहील काय, असा प्रश्न शेतक-यांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापुर्वी दुरुस्तीचे काम झाले तर प्रकल्पात पाणी साठा पुर्ण क्षमतेने साठणार आहे. त्यामुळे शेतक-यांचाही फायदा होणार आहे. पावसाळ्यापुर्वी काम सुरु करावे, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.