कुर्डुवाडी : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तत्काळफाशी द्यावी, या मागणीसाठी कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद होती.त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
प्रारंभी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हाती निषेध फलक घेऊन व काळ्या फिती लावून पदयात्रा काढून सरपंच देशमुख हत्येचा निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेऊन सर्व आरोपींना फाशीची शिक्षा
द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कुर्डुवाडी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व चौक, बाजारपेठ, बा वळण रस्ता परिसर या ठिकाणची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दवाखाने,मेडिकल दुकान या अत्यावश्यक सेवा तेवढ्या चालू होत्या. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंददरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.