कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान होताना दुसरीकडे मात्र सुदैवाने आराम बसमधील सर्व ५५ प्रवासी बचावले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की डॉल्फिन कंपनीची आराम बस (क्रमांक एमएच ०३, पी.सी. ४५००) ही सुमारे ५५ प्रवाशांना घेऊन मिरजेहून मुंबईकडे निघालेली असताना (तासवडे, ता. कराड) गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. त्यात या बसला पाठीमागून आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.
बसला आग लागल्याचे पाहून महामार्गावरून जाणा-या अन्य वाहनातील लोकांनी ही माहिती तासवडे टोलनाक्यावरील कर्मचा-यांना दिली. लगेचच टोलनाका व्यवस्थापनाने मदतीसाठी आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. महामार्ग व्यवस्थापनाचे गस्त घालणारे पथक, तळबीड पोलिस हेही दाखल झाले. सर्व प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.