नांदेड : प्रतिनिधी
नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे हळद काढण्यासाठी मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे शेतामध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये सदर ट्रॅक्टर कोसळले. या ट्रॅक्टरमध्ये जवळपास दहा ते बारा जण होते. त्यातील ८ महिलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केल्या जात असून शुक्रवारी दुपारपर्यंत एकाचा मृतदेह विहिरी बाहेर काढला होता.
शोध कार्य युद्धपातळीवर सुरू असून नांदेड जिल्ह्यातील सर्व यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली आहे .जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह आपत्ती नियंत्रण समितीचे सर्व पदाधिकारी शहरातील पुढारी मोठ्या संख्येने आलेगाव मध्ये दाखल झाले आहेत. आलेगाव तालुका नांदेड येथे शुक्रवारी सकाळी गावातून ट्रॅक्टरमध्ये बसून दहा ते बारा मजूर हळद काढण्यासाठी शेतामध्ये जात असताना रस्त्यामध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये वाहकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळले विहीर जवळपास ५० ते ६० फूट खोल आहे.
यातील दोन महिला विहिरीमधून बाहेर निघाल्या त्यांचा जीव वाचला मात्र आठ ते दहा जण अजूनही विहिरीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून गुरुवारी दुपारी एक वाजता एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर आणखी सात ते ८ जणमध्ये अडकले असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनकर यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत लिबगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.