नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, समितीने पुन्हा एकदा रेपो दरांत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर सध्या ६.५ टक्के आहे. मात्र, आता आरबीआय यावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचेही शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पाचव्या पतधोरण बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दर सध्या स्थिर राहील.
आरबीआयच्या बैठकीत ६ पैकी ५ सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर ४ टक्क्यांच्या खाली आणण्यावर भर दिला जाईल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची वाढ ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी आरबीआयने ६.५ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. ते म्हणाले की, जीडीपी तिसऱ्या तिमाहीत ६.५ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६ टक्के दराने वाढेल. दास म्हणाले की, २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी ग्रोथ ६.७ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.५ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ६.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.