नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मागासवर्गीय शाळांचा प्रश्न तसेच आश्रम शाळांमधील रिक्त पदे, ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे कधी सुरू करणार? यावरुन सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक झाले.
विधानसेभत लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, यावर्षी आधार योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना सरकारने दिला पाहिजे. पण अजून हा लाभ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही. त्यांची वसतीगृहे सुरू करावीत. ही मुले कुठे शिकणार कशी? याचा विचार सरकारने करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
तसेच ओबीसी विभागाच्या तीन मीटिंग झाल्या असे सर्वजण बोलले. पण वसतिगृह कधी सुरू करणार सांगितले नाही. ७२ वसतिगृह कधी सुरू करणार? हा खरा प्रश्न आहे. पीएचडीसाठीची शिष्यवृत्तीची संख्या वाढवावी. लोकसंख्येचा विचार करून यापुढे शिष्यवृत्तीची संख्या निश्चित करण्यात यावी, अशी देखील त्यांनी मागणी केली.
दरम्यान, वडेट्टीवार यांनी केलेल्या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले. परदेशी शिष्यवृत्ती आता ५० वरून ७५ विद्यार्थ्यांना केली असून सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली आहे. सरकारने ओबीसी वसतिगृहाबाबत सभागृहात भूमिका स्पष्ट केली. ७२ पैकी ५२ वसतीगृहे सुरू करू, रिक्त पदांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ, असे सरकारकडून सांगण्यात आले.