परभणी : श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र विश्वस्त मंडळ नांदेडच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेत परभणी येथील ओंकार भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते विजेत्या संघास प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये ७१ हजार व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ओंकार भजनी मंडळाच्या या दैदिप्यमान यशाने परभणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या भजन स्पर्धेमध्ये ओंकार भजनी मंडळाच्या संघातील गायक नरेंद्र जोशी यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ध्यान करू जाता मन हरपले , गायक श्रीकांत कुलकर्णी यांनी दत्त माझा गुरुराया हे दत्तगुरुचे भक्ती गीतगायन केले तर धोंडोपंत कुलकर्णी यांनी पावा घोंगडी घेऊनी पाही ही गवळण सादर केली.
साथीला हार्मोनियम वादन श्रीकांत कुलकर्णी यांनी तर तबला शंकर आजेगावकर, पखवाज साथ भगवान लिंगायत यांनी केली. विजेत्या संघात ओंकार भजनी मंडळाचे अध्यक्ष अॅड. सच्चिदानंद कुलकर्णी, कृष्णा लिंबेकर, नकुल काशीकर व मनोज कुलकर्णी यांचा समावेश होता.
दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून जवळपास २५ संघांनी भाग घेतला होता. स्पर्धा एवढी अटीतटीची झाली की पाहणा-यांचीही उत्कंठता शिगेला पोहचली होती. यात परभणीच्या ओंकार भजनी मंडळाने अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाला गवसणी घातली असून विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.