21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयतुटलेले प्रेमसंबंध आत्महत्येचे कारण नव्हे!

तुटलेले प्रेमसंबंध आत्महत्येचे कारण नव्हे!

सर्वोच्च न्यायालयाचा आरोपीला दिलासा

नवी दिल्ली : संपुष्टात आलेल्या प्रेमसंबंधांमुळे एखादी व्यक्ती भावनात्मकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते, परंतु गुन्हा करण्याचा हेतू नसल्याने तुटलेले संबंध हे आत्महत्येचे कारण ठरू शकत नाहीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिले. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करत संबंधित आरोपीला दिलासा दिला.

न्या. पंकज मिथल व न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने एका २१ वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात कमरुद्दीन सनदी या आरोपीस दोषी ठरवले होते. माझ्या मुलीचे आरोपीशी आठ वर्षे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे वचन न पाळल्याने माझ्या मुलीने ऑगस्ट २००७ मध्ये आत्महत्या केली, अशी तक्रार या तरुणीच्या आईने केली होती. सनदीवर भादंविच्या कलम ४१७ (फसवणूक), ३०६ (आत्महत्येस कारण ठरणे) आणि ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते.

सनदीला पाच वर्षांची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. सनदीने या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर झालेल्या सुनावणीअंती खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला. हे संपुष्टात आलेल्या संबंधांचे प्रकरण असून, हा गुन्हेगारीविषयक खटला होऊ शकत नाही, असा निर्वाळा खंडपीठाने १७ पानी निकालात दिला. हा निर्णय देताना खंडपीठाने मृत तरुणीजवळ आढळलेल्या दोन चिठ्ठया विचारात घेतल्या. ‘या तरुणीने शारीरिक संबंधांविषयी काहीही भाष्य केलेले नाही. तसेच, आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यात नाही असे खंडपीठाने नमूद केले.

मानसिक स्थितीवर अवलंबून
एखादी महिला क्रौर्याची बळी ठरली व त्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले तरी गृहकलह व मतभेद हे प्रकार आपल्या सामाजिक कौटुंबिक जीवनात नित्याचे आहेत आणि या प्रकारचे गुन्हे घडणे हे पीडितेच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते, असे न्यायालय नेहमीच मानते असेही या खंडपीठाने स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR