जळगाव : प्रतिनिधी
जळगावच्या यावलमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बसस्थानकात पोहोचण्यापूर्वीच प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बसच्या खाली सुखरूप उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहारातील बसस्थानकाजवळ असलेल्या पंचायत समितीसमोर एसटी बसने अचानक पेट घेतला. ही बस विदगाव मार्गे यावलला आली होती. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली. बस थांबताच सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
यावल एसटी आगाराची बस प्रवासी घेऊन जळगाव येथून विदगाव मार्गे यावलकडे येत होती. ही गाडी यावल शहरातील पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्गावर होती. यावेळी अचानक बसमधून धूर निघायला सुरुवात झाली.
काही वेळात एसटी बसला आग लागल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच एसटीत एकच गोंधळ उडाला. चालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने बस थांबवली. सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. ही घटना इतर ठिकाणी घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. याबाबत यावलचे आगारप्रमुख दिलीप महाजन यांना विचारले असता, वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा असे त्यांंनी म्हटले आहे.