25.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल

मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार?

बीड : परभणीतील मूक मोर्चामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य मनोज जरांगे यांना भोवण्याची चिन्हे आहेत. मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता.

मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला. याच्या निषेधार्थ रविवारी सकाळपासून परळी पोलिस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले आणि घोषणाबाजी केली. मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

नेमके काय म्हणाले होते मनोज जरांगे?
परभणीच्या मोर्चामध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR