जालना: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीवरून जालन्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हे दाखल केले आहेत. माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि आमदार राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे यांच्या घरावर करण्यात आलेल्या दगडफेक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी स्वत:हून हा गुन्हा दाखल केला आहे. एकूण १८ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्यात पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तर, यात महिला आरोपींचा देखील समावेश आहे.
शनिवारी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राजेश टोपे यांच्या गाडीची काच अज्ञात लोकांकडून फोडण्यात आली होती. त्यानंतर रात्री पुन्हा आमदार बबनराव लोणीकर व सतीश टोपे यांच्या निवासस्थानी अचानक आलेल्या १७ ते १८ जणांनी दगडफेक केली होती.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवले होते. दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दगडफेक करण्यात तीन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.