धाराशिव : प्रतिनिधी
एका जागेवर एकच गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करून जागेचे वाटप करणे गरेजेचे असताना एका जागेवर तीन गृहनिर्माण संस्था स्थापन करून तीन्ही संस्थेच्या नावे चुकीच्या पद्धतीने जागेचे वाटप केले. या प्रकरणी हेमंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव येथील तालुका सहाय्यक निबंधकासह तीघांवर आनंदनगर पोलीस ठाणे येथे दि. ११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, धाराशिव शहरातील तांबरी विभागातील आरोपी सुनिता बागल, संदीप बागल व धाराशिव तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी यांनी दि.१८ मे ते आजअखेर धाराशिव शिवारातील सर्व्हे नं २८/२ मधील प्लॉट नं १ मधील २७१६.९३ चौरस मिटर या जागेवर एकच गृहनिर्माण संस्था स्थापन करणे आवश्यक होते. असे असताना तीन संस्था स्थापन करुन तिन्ही संस्थेच्या नावाने चुकीच्या पध्दतीने जागेचे वाटप केले. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करुन हेमंत मुकूंद चौधरी व इतर सदनिका धारकांची फसवणूक केली. या प्रकरणी हेमंत चौधरी यांनी दि.११ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये तीघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.