पुणे : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे आगीप्रकरणी कारखानाचालक आणि मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी शरद सुतार, शरद सुतार, जन्नत नजीर शिकलगार आणि नजीर अमीर शिकलगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी, नजीर अमीर शिकलगार याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तळवडे या ठिकाणी शुक्रवारी तीनच्या सुमारास स्पार्कल कॅण्डल बनवणा-या कारखान्याला भीषण आग लागली होती.
यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर १० जण जखमी आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनापरवाना कारखाना चालवणे त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केलेली तडजोड, स्पार्कल कॅण्डल बनवण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके, ज्वालाग्राही पदार्थ बेकायदा वापरला जात होता, याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका फटाक्यांच्या गोदामाला मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्ािंपरी-चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली होती. दरम्यान, याची माहिती मिळताच काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली होती. मात्र, तोपर्यंत ६ जणांचा बळी गेला होता. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील तडजोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर, पोलिसांच्या तपासात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
फटाक्यांचा कारखाना अनधिकृत
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कारखाने अवैधरीत्या चालत असल्याचे आरोप नेहमी केले जातात. दरम्यान, फटाका गोदामात लगलेल्या भीषण आगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अवैधरीत्या चालणा-या गोदामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता अशा अवैध कंपन्या किंवा गोदामावर पिंपरी-चिंचवड महापालिका काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.