चेन्नई : तामिळनाडूतील तिरुपथूर जिल्ह्यातील वानियाम्बडीजवळ सरकारी बस आणि खासगी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात दोन चालकांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. तामिळनाडूची सरकारी बस आणि खासगी वाहन यांच्यात अचानक धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन चालकांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहने चक्काचूर झाले आहेत. सध्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी पाठवले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या अपघातात कोणाची चूक होती हे अद्याप समजू शकलेले नाही.
या अपघातात ४० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी तत्काळ घटनास्थळी येऊन जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी वानियांबडी शासकीय रुग्णालयात पाठवले. गंभीर जखमींपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी वेल्लोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात किमान पाच जण जागीच ठार झाले असून मृतांमध्ये सरकारी बस चालक एलुमलाई यांचा समावेश आहे जे मूळचे उलुंदुरपेट येथील होते. इतर मृतांमध्ये खाजगी बस चालक मोहम्मद नदीम मूळचा कोलारचा, खाजगी बस क्लिनर मोहम्मद बैरोस मूळचा वानियामपाडी, चित्तूरचा अजित कुमार आणि कृतिका नावाची महिला चेन्नईची आहे.
यानंतर वानियांबडी ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहेत. तसेच, रस्त्यावरील वाहनांना बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली. वानियांबडीचे आमदार सेंथिल कुमार, तिरुपत्तूरचे जिल्हाधिकारी बास्करा पांडियन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अल्बर्ट यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींचे सांत्वन केले.