इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांना इच्छा आहे, मात्र सध्या तरी राज्यात शांतता प्रस्थापित होताना दिसत नाही. मणिपूमध्ये शांततेसाठी कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, राजभवनाने शनिवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, १० राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. त्यांनी मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी दोन समुदायांमध्ये शांतता चर्चा सुरू करण्याची विनंती केली आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओ इबोबी सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी राज्यपालांना निवेदन सादर केले. केंद्राच्या, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाशिवाय राज्यात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यांनी दोन्ही समुदायांसोबत शांतता चर्चा तातडीने सुरू करण्याचे आवाहन केले, जेणेकरून चालू असलेल्या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
मणिपूरमधील कुकी-जो जमातींची आघाडीची संघटना असलेल्या आयटीएलएफने बुधवारी, ते बहुसंख्य असलेल्या भागात ‘स्वयंशासित स्वतंत्र प्रशासन’ स्थापन करण्याची धमकी दिली, त्यानंतर शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. कुकी-जो समुदायाचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये आयटीएलएफच्या स्वशासित स्वतंत्र प्रशासनाच्या आवाहनाचा राज्य सरकारने तीव्र निषेध केला आहे आणि त्याला बेकायदेशीर म्हटले आहे.