21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमोसंबी बागेवर शेतक-याने चालवली कु-हाड

मोसंबी बागेवर शेतक-याने चालवली कु-हाड

मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका मोसंबीच्या बागेला बसताना पाहायला मिळत आहे. कारण यंदा मोसंबीसह अन्य फळबागा जगवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असून, समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव व कूपनलिका कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी शेतकरी मोसंबीच्या बागा तोडत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण येथील शेतकरी कल्याण तळपे यांनी मोसंबीची तीनशे झाडे तोडली आहेत. विहिरीत पाणीच नसल्याने बाग जगवणे शक्य नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कल्याण तळपे यांनी १० वर्षांपूर्वी मोसंबीची तब्बल तीनशे झाडे लावली होती. या काळात त्यांनी मोठ्या कष्टाने मोसंबीची बाग वाढवली. लेकरांप्रमाणे जीव लावून मोठी करून यातून त्यांना उत्पादन देखील मिळत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाला असल्याने विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटले आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील बहुतांश भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार की नाही याची देखील शाश्वती नाही. त्यामुळे मोसंबी बाग जगवणे शक्य नसल्याने तळपे यांनी दहा वर्षांपासून मोसंबी पीक देणा-या झाडांवर कु-हाड चालवली आहे.

परिस्थिती गंभीर…
यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणा-या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील अनेक गावांत आत्तापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR