कठुआ : देशात कधी कुठे काय घडेल हे सांगता येत नाही. यामुळे चंद्रावर यान पोहोचवणा-या आपल्या देशातील यंत्रणा कशी कुचकामी आहे हे समोर येते. असाच एक प्रकार कठुआ रेल्वे स्थानकात पाहावयास मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ रेल्वे स्थानकात उभी असलेली एक मालगाडी ड्रायव्हरशिवाय धावली. यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही रेल्वे ताशी ७० ते ८० कि.मी. वेगाने धावली.
या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मालगाडी लोकोमोटिव्ह पायलटशिवाय कठुआहून पठाणकोटच्या दिशेने गेल्याचे समजल्यानंतर त्या मालगाडीला पंजाबमधील उंची बस्सीजवळ रिकव्हरी इंजिनच्या सहाय्याने थांबवण्यात आले, अशी माहिती जम्मू विभागीय वाहतूक व्यवस्थापकांनी दिली.
नशीब ही मालगाडी होती आणि समोरून दुसरी कोणतीही रेल्वे आली नाही, तसे झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, या अगोदरच कित्येक रेल्वे अपघात झाले आहेत, यामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.