छत्रपती संभाजीनगर : नेहमी साप बेडकाची शिकार करतो हे सर्वांनाच ठाऊक आहे; मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील हायकोर्ट कॉलनीमध्ये निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भूत प्रकार पाहायला मिळाला. येथे सुमारे एक ते दीड फूट लांबीचे नागाचे पिल्लू चक्क एका बेडकाच्या तोंडात अडकलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच ‘लाईफ केअर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’चे सर्पमित्र दाऊद शेख यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या ‘बेबी नागा’ला बेडकाच्या पकडीतून सुरक्षितपणे सोडवले.
वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पावसाळयाच्या दिवसांत उंदीर, बेडूक आणि इतर खाद्यपदार्थांच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास येतात. मात्र या घटनेत नेहमीच्या विरुद्ध चक्र पाहायला मिळाले; सापाने बेडकाची शिकार करण्याऐवजी उलट बेडकानेच नागाच्या छोटया पिल्लाला आपल्या तोंडात पकडून ठेवल्याचे दुर्मीळ दृश्य दिसल्याने हायकोर्ट कॉलनी परिसरात या घटनेची दिवसभर मोठी चर्चा रंगली होती.
















