अकोला : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असून या भेटीत सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथ याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून ५० लाख आणि नोकरीचे आमिष देण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांनी दिली आहे.
परभणी दंगलीत न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला अकोल्यात आले आहे. अकोल्यातील कृषीनगर भागातल्या यशवंत भवन या निवासस्थानी सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ, काका आणि मावशी यांनी ही भेट घेतली आहे. आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी, मावशी तेजश्री दिगंबर विटकर, मावसा दिगंबर यलप्पा विटकर यांचा यात समावेश आहे. या भेटी दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ५० लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथने हा खळबळजनक आरोप केला आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर आपल्याला गप्प बसण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता, असा सोमनाथच्या भावाचा आंबेडकरांशी बोलताना दावा आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या दाव्यानंतर प्रकरणातील नवीन तथ्य समोर आले आहे.
आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींवर सोमनाथच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली. राज्यात संतोष देशमुख यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून राजकारण तापलेले असताना सूर्यवंशी कुटुंबीयांनी आंबेडकरांची भेट घेतली. या आधी आंबेडकरांनी परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आतापर्यंत राहुल गांधींसह राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी घेतली भेट. दरम्यान, प्रकाश आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील अशी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आशा आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
परभणीमध्ये मंगळवारी १० डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.