लंडन : महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांच्या धमाल जुगलबंदीने आता थेट सातासमुद्रापार क्रिकेटच्या मैदानावरही रंग भरले आहेत. कार्डिफ येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यादरम्यान या दोन्ही कलाकारांनी मैदानावर उपस्थित राहून प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मनोरंजन केले. त्यांच्या लोकप्रिय स्किट्सपैकी एक लोचन मजनू आणि मनोमिलन स्वरछेडेच्या भूमिकेत त्यांनी मस्त कॉमेडी केली. सामना सुरू होण्यापूर्वी या दोघांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि ‘लॉर्ड शार्दुल’ म्हणजेच शार्दुल ठाकुरला प्रश्न विचारला, ज्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर मराठी भाषेचा आणि विनोदाचा तडका देत समीर चौघुले आणि ओंकार राऊतने शार्दुल टाकुरला प्रश्न विचारला. समीर चौघुले म्हणाले,’आम्ही सर्वांचा लाडका शार्दुल ठाकुरला शुभेच्छा देतो. मॅजिकल बॉलर..तुम्हाला मनापासून खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. तर ओंकारने शार्दुलला प्रश्न विचारला की, मला खरंच कळत नाही तुम्ही आल्या आल्या विकेट कसं काय घेता? दरवेळी तुम्ही पहिल्याच ओवरला विकेट घेता, हे कसे?
यावर शार्दुललाही हसू अनावर झाले आणि त्याने मराठीत उत्तर दिले. तो म्हणाला समीर सर तुम्ही खूप सीनिअर कलाकार आहात. मी तुमची हास्यजत्रा नेहमी बघतो. तुमच्या शुभेच्छा मिळाल्या त्यासाठी धन्यवाद. जेव्हाही मी बॉलिंग करायला येतो एक-दोन विकेट्स काढून जातो ही देवाचीच माझ्यावर कृपा आहे. लोकांना त्यातून आनंद मिळतो. जसे तुम्ही हास्यजत्रेत कॉमेडी करुन लोकांना आनंद देता तसाच मीही एक छोटासा प्रयत्न करतो. जेव्हाही मी खेळतो तेव्हा टीम इंडियाच्या चाहत्यांना आनंद देऊ इच्छितो. त्या प्रयत्नातच मलाही विकेट मिळतात. तुमचा मेसेज ऐकून छान वाटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
















