रत्नागिरी : रत्नागिरी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १९ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत.
रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. या बसमधील १९ प्रवाशी सुदैवाने बचावले आहे. तरुणाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशी बचावले आहेत. बसच्या टायरला आग लागल्याची बाब तरुणाच्या लक्षात आली आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले.
मध्यरात्री जवळपास पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बसला आग लागली. बसमधील सर्व सामान जळून खाक झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. बसच्या टायरला आग लागली आणि पुढील काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. पण, त्याआधी मुंबईत शिक्षण घेणा-या आर्यन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १९ प्रवासी, दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा जीव वाचला. सर्वजण गाढ झोपेत असताना बसच्या टायरने अचानक पेट घेतला.