39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीययथोचित सन्मान!

यथोचित सन्मान!

राजकीय पक्ष म्हणून भाजपला आज जे वैभव प्राप्त झाले आहे व या पक्षाचा जो विस्तार देशभर झाला आहे त्याची पायाभरणी करणा-या लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न सन्मान देऊन मोदी सरकारने उशिरा का होईना कृतज्ञता व्यक्त केली. याचा मूळ भाजप कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झाला असेल. ज्या राम मंदिर उभारणीसाठी अडवाणी यांनी रथयात्रा काढली व भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा पाया घातला त्या जननायक ठरलेल्या अडवाणींना राम मंदिराची स्वप्नपूर्ती झाल्यावर जाहीर झालेला भारतरत्न सन्मान राम मंदिराचे स्वप्न उराशी बाळगून प्रदीर्घ प्रतीक्षा करणा-या रामभक्तांना सुखावून टाकणाराच आहे.

अर्थात मोदी सरकार आपल्या प्रत्येक कृतीतून व निर्णयातून राजकीय हित साधण्यास प्राधान्य देत असल्याने अडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात तसाच कुठला हेतू असणार ही शंका नाकारता येत नाही! कदाचित ज्या राम मंदिरासाठी भारतीय जनतेने प्रदीर्घ प्रतीक्षा केली त्याच्या स्वप्नपूर्तीचा मूळ नायक म्हणून अडवाणींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यामागे दुहेरी राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोदी सरकारचे समीकरण असू शकते. शिवाय मोदी आपण आपल्या राजकीय गुरूंबाबत कृतज्ञ आहोत हा संदेश स्वपक्षीय सहकारी, कार्यकर्त्यांना व भारतीय जनतेलाही देऊ इच्छित असावेत. असो! नेमका हेतू काय व तो कितपत साध्य होईल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तूर्त भाजपच्या आजच्या वैभवाची पायाभरणी करणा-या अडवाणींचा यथोचित सन्मान झाला, अशीच भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते व सामान्य जनतेची भावना आहे आणि ती चुकीची नाही.

अडवाणी यांनी राष्ट्रासाठी समर्पित भावनेने जे योगदान दिले आहे ते विरोधकांनाही नाकारता येणार नाही. अडवाणी यांचा जन्म कराचीतला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाहोर शाखेत जायचे. जन्मभूमीपासून विलग होण्याचे जे दु:ख हजारो-लाखो भारतीयांना फाळणीने दिले ते अडवाणी यांनाही सोसावे लागले. शरणार्थी म्हणून भारतात आल्यावर त्यांची व्याकूळता निग्रहात परावर्तीत झाली. रा. स्व. संघाचे प्रचारक, भारतीय जनसंघाचे जबाबदार कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक, प्रदीर्घ काळ विरोधी पक्षनेते, देशाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री अशा प्रत्येक भूमिकेत अडवाणी यांनी अत्यंत संयतपणे प्रभावी कामगिरी केली. आणीबाणीत त्यांनी कारावास भोगला. राम मंदिरासाठीची रथयात्रा, जनादेश यात्रा, स्वर्णजयंती रथयात्रा, भारत उदययात्रा, भारत सुरक्षायात्रा, जनचेतना यात्रा अशा विविध उपक्रमांद्वारे ते सामान्य जनतेच्या थेट संपर्कात राहिले. यातूनच त्यांची रामजन्मभूमी आंदोलनाचा जननायक अशी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या रथयात्रेने भारतीय राजकारणात तोवर अडून-अडून वा आडमार्गाने येणा-या धर्माचा राजरोसपणे शिरकाव झाला. भारतीय राजकारणाचा पोतच अडवाणी यांच्या रथयात्रेने बदलून गेला. तेथूनच भाजपने भारतीय राजकारणात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या संकल्पनेचा पाया घातला व पुढे या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार केला.

अयोध्येत कारसेवक अनियंत्रित होऊन बाबरी मशिदीचे पतन झाले ते पाहताना हा लोहपुरुष असहाय व अगतिक झालेला देशाने बघितला. रामजन्मभूमी आंदोलनात डोळ्यादेखत स्वयंनेतृत्वाची पकड सैल झाल्याचे शल्य अडवाणी यांना आजही बोचत असेल. पाकिस्तानात जाऊन महंमद अली जीना यांच्या मजारीवर दर्शन घेतल्याने त्यांच्यावर झालेली टीका तुनलेने खूप मोठी होती. मात्र, त्यांनी अजिबात संयम ढळू न देता संयतपणे ती पचवली. त्यांना त्यामुळे स्वपक्षाचे अध्यक्षपदही गमवावे लागले पण त्यांनी संयम सोडला नाही. त्यामुळेच त्यानंतर काही वर्षांतच भाजपला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अडवाणी यांनाच पुढे करावे लागले. राजकारणातल्या या सर्वोच्च संधीने त्यांना हुलकावणीच दिली. मात्र, त्याचे नैराश्य त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीच प्रतिबिंबित होऊ दिले नाही. हवाला घोटाळ्यात नाव येताच कुठलाही विलंब न करता राजीनामा देण्याची नैतिकता त्यांनी दाखविली. पुढे न्यायालयीन लढाई जिंकल्याने त्यांची प्रतिमा आणखी लख्ख झाली. राजकारणात स्पष्टता ही राजकीय वैरभाव वाढविणारीच ठरते. मात्र, स्पष्टता बाळगूनही राजकारणातील स्नेह जपण्याची किमया अडवाणी यांनी साधली. त्यामुळेच आजच्या विषवत् राजकीय वातावरणातही त्यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्यावर विरोधकांकडूनही त्यांचे अभिनंदन झाले व योग्य सन्मान दिल्याचे समाधान व्यक्त झाले.

वाजपेयी यांच्या लौकिकामुळे अडवाणी यांचे नेतृत्व कायम दुय्यम ठरले पण त्यांनी अत्यंत संयमाने मनातून हे वास्तव स्वीकारण्याचा दिलदारपणा दाखविला. रालोआ घटक पक्षांना आपल्यापेक्षा वाजपेयी जास्त स्वीकारार्ह ठरतील हे लक्षात घेऊन त्यांनी सरकार स्थापनेत दुय्यम भूमिका मोठ्या मनाने स्वीकारली. वाजपेयींच्या तुलनेत त्यांची प्रतिमा जहाल हिंदुत्ववादी नेते अशीच तयार झाली. मात्र, पक्षहितासाठी त्यांनी ती शांतपणे स्वीकारली. स्पष्टवक्तेपणा कायम ठेवून त्यांनी आपली कणखरता कायम दाखवून दिली. ‘गुजरात दंगलीनंतर वाजपेयी यांना नरेंद्र मोदींचा राजीनामा हवा होता’ या वाक्याचा पुनरुच्चार करण्यास वा राजकारणातील अनुभवाकडे दुर्लक्ष करून वयोमर्यादेची अट घालत ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवण्याच्या मोदी यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करण्यास अडवाणी अजिबात कचरले नाहीत. सहकारी नेत्याला काकणभर अधिक महत्त्व देऊन कायम दुय्यम भूमिका स्वीकारणे ही बाब राजकीय क्षेत्रात अपवादच! मात्र, अडवाणी यांनी मोठ्या मनाने ही बाब कायमची स्वीकारण्याचा संयम दाखविला. माध्यमांमध्ये त्यांची कडवी प्रतिमा रंगविण्याची स्पर्धा लागलेली असतानाही त्याचा स्वत:वर अजिबात परिणाम होऊ न देता संयमीपणे त्यांनी मध्यममार्गी नेतृत्वाचा मार्ग स्वीकारला.

अत्यंत मर्यादाशील वागणूक हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. ते त्यांनी कायम जपले. दीर्घकाळचा संघर्ष व सत्ताविहीनता अनेकांचा लढाऊ बाणा क्षीण करते. मात्र, आपल्या निग्रही स्वभावातून सातत्याने विरोधकांचे तळपणे कसे असते, हेच अडवाणी यांनी आपल्या कामकाजातून दाखवून दिले. राजकारणातल्या अशा या लोहपुरुषाची प्रतिष्ठित दखल सन्मानाच्या रुपाने घेतली गेली आहे. या सन्मानाने त्यांना संपन्न आयुष्याचा दिलासा मिळाला आहे. आनंदाच्या व संतुष्टतेच्या या क्षणी त्यांना पं. दीनदयाळ उपाध्याय व अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण झाले. वाजपेयी, नानाजी देशमुख यांच्यानंतर भारतरत्न सन्मान प्राप्त झालेले अडवाणी हे संघ परिवारातील तिसरे ज्येष्ठ नेते आहेत. संयमाने दुय्यम स्थान स्वीकारणारे सारथी ही लालकृष्ण अडवाणी यांची ओळख कायम देशाच्या स्मरणात राहील. ९६ व्या वर्षी संतुष्टावस्थेत असणा-या या लढवय्या व ज्येष्ठ नेत्याचे अभीष्टचिंतन!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR