नाशिक : नाशिकसह विभागातील लाचखोरी सतत वाढत असून अहमदनगर येथील एक कोटीचे लाच प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून एक प्रकरण समोर आले आहे. जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच मागत ३५ हजार रुपयांची लाच घेणा-या पोलिस हवालदारासह एका युवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
नाशिक विभागात गेल्या काही दिवसांत सातत्याने लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवडाभरात चार कारवाया करण्यात आल्याने लाचखोरीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे समोर आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आणखी एक लाचखोरीची कारवाई समोर आली आहे.
पोलिस कारवाईदरम्यान जप्त केलेला ट्रक सोडविण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्रयस्थ व्यक्तीमार्फत ३५ हजार रुपये घेणा-या पोलिसांसह मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. नाशिक पोलिस ठाण्यातील अंमलदार रवींद्र बाळासाहेब मल्ले आणि मध्यस्थ तरुण मोहन तोंडी अशी संशयितांची नावे आहेत.