अहिल्यानगर : येथे नुकतीच ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील लढतीची चौकशी करण्यासाठी कुस्ती क्षेत्राशी संबंधित ५ जणांची चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. अशी माहिती माहिती राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी योगेश दोडके यांनी दिली.
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, दिनांक २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी अहील्यानगर येथे ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागामध्ये अंतिम फेरीत पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे ही कुस्ती झाली. या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन छ. संभाजीनगर येथील आंतराष्ट्रीय पंच नितेश काचुलिया, मॅट चेअरमन म्हणून शासकीय कोच पै. दत्तात्रय माने व साईड पंच म्हणून विवेक नाईक यांची नेमणुक करण्यात आली होती. सदर कुस्तीच्या निकालवरुन बराच गदरीळ झाला, स्पर्धा संपल्यानंतर जनमानसात सुध्दा निकालावरून नाराजी व्यक्त होताना दिसली.