नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने दादांना मोठा धक्का दिला. भाग्यश्री आत्राम यांनी घड्याळ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून आज तुतारी हातात घेतली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात आता बाप-लेक आमनेसामने आले आहेत.
यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली, ते चुकीचे होते. मंचावर अजितदादा होते, महिला आयोग अध्यक्षा होत्या, तरीही बोलले. मी घर फोडून जात नाही, धर्मरावबाबा नक्षल तावडीत होते, तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली. अजितदादा यांनी म्हटले चूक झाली. तुम्हीच शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही. २०१९ मध्ये अजितदादा म्हणाले, भीक मागायला आली की तिकीट मागायला. २०१९ ला बाबा भाजपच्या वाटेवर असताना अजितदादा यांनीच मला बी फॉर्म दिला आणि घर फोडून उभे राहा असे म्हटले, याला जयंत पाटील साक्षीदार आहेत, असा गौप्यस्फोटही केला.
माझ्यासोबत जनता
मी स्वत: घर सोडून आली आहे. मी माझा मार्ग वेगळा केला आहे. बाबा अजूनही राजाप्रमाणे थाटात आहेत, सुधरले नाहीत. आम्हाला कुणी हात धरून शिकविले नाही. मला संधी द्या, सोने करेल. माझ्यासोबत जनता आहे. आता माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. ते शेर आहेत तर मी शेरनी आहे, माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन, असा इशारा देखील भाग्यश्री आत्राम यांनी दिला.