मुंबई : मुंबईत गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. येथे एका भरधाव कारने टोल प्लाझा येथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण जखमी असल्याची माहिती आहे. कार वरळीहून वांद्र्याकडे जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले की, सी लिंकवर टोल प्लाझाच्या १०० मीटर आधी इनोव्हा कार मर्सिडीज कारला धडकली. यानंतर इतर दोन-तीन वाहनांनाही या कारने धडक दिली. या अपघातात मर्सिडीज आणि इनोव्हासह सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जखमींपैकी ४ जणांची प्रकृती स्थिर असून इतर २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमींपैकी एकावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून, इतर पाच जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारचे नियंत्रण सुटले. टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना त्याची धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.