31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरभरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली

भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली

कारमधील ४ मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी

बीड : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केज तालुक्यातील माळेगाव शिवारात शनिवार दि. १२ एप्रिल रोजी पहाटे २ वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसवर भरधाव वेगातील अनियंत्रित कार धडकली. यात कारमधील ४ मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी झाले असून बसमधील ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्डयात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला.

हिंगोली आगाराची बस क्रमांक एमएच १४ बीटी २५२९ ही ४५ प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून हिंगोलीकडे निघाली होती. शनिवारी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान माळेगाव बस थांब्या जवळील वळणावर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाणा-या भाविकांची भरधाव कार ( क्र. एमएच ४६ बीबी १७६९) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बसवर समोरून धडकली. यात कारमधील हनुमंत चिंतामण पांचाळ(२८ वर्षे) सुधाकर भीमराव वाकूरे(३० वर्षे) विलास मधुकर वाघमारे(२५ वर्षे), संतराम माधव जावडे(४० वर्षे, चौघेही रा शुक्लेश्वर निंबगाव ता माजलगाव) हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

तर बसमधील ४ प्रवाशीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच युसूफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, जमादार महादेव केदार व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

बस चालकाच्या दक्षतेमुळे हानी टळली
कोल्हापूर येथून हिंगोलीकडे जाणारी बस माळेगाव बस थांब्याजवळ येताच समोरून येणारी कार बसवर धडकली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग नियंत्रित करण्यात यश मिळविले. अन्यथा बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळून मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे बसमधील ४४ प्रवासी बालंबाल बचावले.

कारमधील चौघेही मद्यधुंद
अपघातात कार चकनाचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच मदतीला धावलेल्या युवकांनी जखमीना नाव, गाव विचारले असता मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे कोणालाही नीट बोलता येत नव्हते अशी माहिती मदतीला धावून आलेल्या युवकांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR