मुंबई (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे वादळ आज मंत्रालयापर्यंत आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी करीत सर्वपक्षीय आमदारांनी गुरूवारी सकाळी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर पोलिसांनी या सर्व आमदारांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, या मागणीसाठी मंगळवारी आमदारांनी मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. काल मंत्रालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकून पाय-यांवर ठिय्या आंदोलन केले होते त्यामुळे मंत्रालयाभोवती मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी साडेअकराच्या सुमारास काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर उतरत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशा घोषणा देत रस्त्यावरच ठिय्या दिला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील व राहुल पाटील, राजू नवघरे, बाळासाहेब आजबे (अजित पवार गट) आणि मोहन उंबर्डे (काँग्रेस) यांचा समावेश होता. आमदारांच्या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूककोंडी झाली होती. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी या सर्व आमदारांना ताब्यात घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.