चंदीगड : हरियाणातील गुरुग्राममध्ये प्रवासी बसला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली जयपूर हायवेच्या सेक्टर ३१ फ्लायओव्हरवर बसला आग लागली. आग लागलेल्या बसमध्ये ५० हून अधिक लोक प्रवास करत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस गुरुग्रामच्या सेक्टर १२ मधून उत्तर प्रदेशला जात होती.
आगीत जखमी झालेल्या २९ जणांना गुरुग्रामच्या सेक्टर १० सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसला गुरुग्राम सेक्टर ३१ फ्लायओव्हरवर अचानक आग लागली. त्यानंतर प्रवाशांनी घाईघाईने खिडक्या-दारांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या लेनवरील सेक्टर ३१ फ्लायओव्हरवरून जाणाऱ्या डबलडेकर बसला आग लागली आणि हळूहळू बसचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. त्यानंतर बसमध्ये प्रवास करणारे लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्या-दारांच्या साहाय्याने बसमधून बाहेर पडू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून उर्वरित जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.