27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयगाझात दर १० मिनिटाला चिमुकल्याचा मृत्यू

गाझात दर १० मिनिटाला चिमुकल्याचा मृत्यू

गाझा होतेय लहान मुलांचे सर्वांत मोठे कब्रस्तान पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती

उत्तर गाझा : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांवर झाला आहे. जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या या युद्धाचा मुलांवर किती परिणाम झाला आहे, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दर दहा मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होत आहे. तसेच दर दहा मिनिटाला दोन मुले जखमी होत आहेत, म्हणजेच दर दहा मिनिटाला तीन मुलांवर हल्ल्याचा परिणाम होणार आहे.

पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू झाल्यापासून ५ नोव्हेंबरपर्यंत मृतांची संख्या दिली आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ९,७७० पॅलेस्टिनी मारले गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी ४,१०० म्हणजे जवळपास निम्मी मुले आहेत. गाझामध्ये ८,०६७ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेक गंभीर आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की १,२५० मुले बेपत्ता आहेत. इस्त्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७० टक्के मुले, महिला आणि वृद्ध असल्याचेही म्हटले आहे.

७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी संघटना हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला आणि सुमारे १४०० लोक मारले. तसेच २०० हून अधिक लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये सातत्याने हल्ले केले आहेत. इस्रायलने हमासला लक्ष्य करून हल्ले केल्याची चर्चा आहे.

दररोज सरासरी १०० मुलांचा बळी
गाझामधील एक महिन्याच्या युद्धाची आकडेवारी सांगते की, येथे दररोज सरासरी १०० हून अधिक मुले मारली जात आहेत. अलिकडच्या वर्षांत, अनेक देशांमध्ये युद्ध झाली आहेत परंतु मुले अशा प्रकारे बळी ठरलेली नाहीत. गाझामध्ये दररोज सरासरी १३६ मृत्यू होतात. अलिकडच्या वर्षांत युद्धाचा सामना करणा-या सीरियामध्ये दररोज सरासरी बालमृत्यूची संख्या ३, अफगाणिस्तान २, येमेन १.५, युक्रेन ०.७ आणि इराक ०.६ आहे.

११ वर्षात १२ हजार मुलांचा मृत्यू
सीरियामध्ये २०११ ते २०२२ या ११ वर्षात १२ हजार मुलांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानमध्ये २००९ ते २०२० या १२ वर्षांत ८ हजार मुलांचा मृत्यू झाला. येमेनमध्ये २०१५ ते २०२२ या ८ वर्षांत ३७००, इराकमध्ये २००८ ते २०२२ या १४ वर्षांत ३१०० आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांत ५१० मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गाझामध्ये अवघ्या एका महिन्यात ४१०० मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. जो अत्यंत चिंताजनक आकडा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR