मुंबई : भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, असे राज ठाकरे म्हणाले, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकूमशहाला पुन्हा स्वीकारणं देशासाठी घातक आहे. एक काळ असा होता, त्यावेळी आपल्याला वाटत होतं की, संमिश्र सरकार नको. आम्हाला देश मजबूत पाहिजे. सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश दिला, तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.
‘मातोश्री’वर पत्रकार परिषदेत ठाकरे पुढे म्हणाले, मविआला पाठिंबा वाढतोय तसेच महायुतीलाही बिनशर्त पाठिंबा मिळत आहे, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांचं कौतुक करतो. काही लोक उघडपणे बिनशर्त पाठिंबा देत आहेत. काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. ही नाटकं आता जनता ओळखत आहे. म्हणून यावेळी हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढत येणा-या लोकसभेत होणार आहे, हे आता लोकांना कळलं आहे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती आम्हाला नको आहे.
सर्वांना सोबत घेऊन जाणारे इंडिया आघाडीचे सरकार देशाची प्रगती करेल. दहा वर्षांपासून एक व्यक्ती एक पक्ष असे चित्र आहे. आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागले आहेत. पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही वृत्ती घातक आहे. म्हणून मला असं वाटतं की, एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रासली आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे. एका व्यक्तीचं मोदी सरकार नको. त्यांनी २०१४ पासून जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत.