बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली होती.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिस-या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर विजय शिवतारे हे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. चर्चेनंतर पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
‘‘बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभिमान जागा करून लढले पाहिजे विशेषत: अजित पवार, २०१९ च्या निवडणुकीत, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता तो राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला, तरी पुढचे सात-आठ महिने त्यांची गुर्मी तशीच होती. कोणाशी नीट बोलत नाहीत,’’ शिवतारे म्हणाले.