पुणे : पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा येथे विचित्र अपघात घडला आहे. पुणे-मुंबई-बंगळुरू बा वळण मार्गावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने मोटारींना धडक दिली आहे. या विचित्र अपघातात चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली आहेत. यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक आणि मोटारी बाजूला काढण्यात आल्या आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, नवले पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणा-या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांचे मृत्यू झाल्यानंतरही याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याचे दिसून येत आहे.