38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्य७० औषधांचे दर नियंत्रणात; केमोथेरपी लस निम्म्या किमतीत

७० औषधांचे दर नियंत्रणात; केमोथेरपी लस निम्म्या किमतीत

नागपूर : रक्तदाब, मधुमेह, कर्करोगासह अनेक जीवनावश्यक महागड्या औषधांच्या दराने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना राष्ट्रीय औषध किंमत नियामकाने दिलासा दिला आहे. मागील तीन महिन्यांत सुमारे ७० पेक्षा अधिक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात कर्करुग्णांच्या केमोथेरपीसाठी वापरल्या जाणा-या लसीचाही समावेश आहे.

राष्ट्रीय औषध किमत नियामकने (एनपीपीए) मधुमेह नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणा-या एका गोळीची किमत २७.७५ रुपये निश्चित केली आहे. पूर्वी त्याची किमत ३३ रुपये प्रतिगोळी होती. यासह, एनपीपीएने रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी टेलमिसार्टन आणि बिसोप्रोलॉल फुमर या औषधाच्या एका गोळीची किंमत १०.९२ रुपये केली आहे. त्याची पूर्वीची किमत १४ रुपयांपर्यंत होती.

राष्ट्रीय औषध किंमत नियामकने कर्करुग्णांच्या केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणा-या लसीची किंमत १०३४.५१ रुपये निश्चित केली आहे. त्याची किंमत पूर्वी दुप्पट होती. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे दर वेगळे आहेत. तसेच नियामक मंडळाने एपिलेप्सी आणि न्यूट्रोपेनियाच्या उपचारात वापरल्या जाणा-या औषधांसह ८० शेड्यूल्ड औषधांच्या कमाल मर्यादा किमतीतही सुधारणा केली आहे.

कोरोनानंतर लोकांच्या औषध आणि वैद्यकीय खर्चात वाढ झाली. परंतु, सरकारने काही आजारांवरील औषधांच्या किमती कमी केलेल्या आहेत. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठीच केंद्र सरकारने ३९ फॉर्म्यूलेशनच्या किमती निश्चित केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR