नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सनी पराभव करत भारताचे स्वप्न भंग केले. भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी आपले मत व्यक्त करत ‘चुकांमधून काहीतरी शिकतो तोच खरा खेळाडू’ असे म्हणत पुन्हा जोमाने तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
कपिल देव एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘खेळाडूंनी जे झाले ते विसरून जावे. हा काही असा धक्का नाही की यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवावे. खेळाडूंना पुढे जावे लागेल. आता तुमच्या पुढच्या दिवसांचे नियोजन करावे लागेल. भूतकाळात झालेली गोष्ट आपण पूर्ववत करू शकत नाही; परंतु कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे.
पराभव झाल्यानंतर कोणीही काहीही बोलू शकतो; पण जिंकल्यावर सर्व संपते. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले; पण ते अंतिम सामना जिंकू शकले नाहीत. पण जो चुकांमधून काहीतरी शिकतो तोच खरा खेळाडू. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कपिल देव यांना आमंत्रित केले नव्हते. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.