पुणे : ‘मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येतील’., अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाट्यगृहांचे येत्या दोन वर्षांमध्ये नूतनीकरण केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणा-या ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सोमवारी नांदी झाली. त्यावेळी सर्व केंद्रावरील स्पर्धकांना दृक-श्राव्य माध्यमातून शुभेच्छा देताना मुनगंटीवार बोलत होते. स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमांमध्ये वाढ, परीक्षकांच्या मानधनामध्ये वाढ आदी बाबीही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे केंद्रावरील स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, बॅकस्टेज कर्मचारी बाळकृष्ण कलाल आणि परीक्षक अनुया बाम, चंद्रकांत झाडकर, जुगलकिशोर ओझा उपस्थित होते. ‘अभिजात, पुणे’ या संस्थेने सादर केलेल्या ‘गि-हाण’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे बिगुल वाजले.
यंदा पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत एकूण २३ संघांचे सादरीकरण होणार असून सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा रंगणार आहे. १४ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता एका संघाचे सादरीकरण होईल. मात्र २४ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर या दोन दिवशी सादरीकरण होणार नाही.
गतवर्षी भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाने लाईट्सच्या वीजबिलात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यात सूट देण्याच्या सरकारने केलेल्या विनंतीचाही त्यांनी अव्हेर केला होता. याचा फटका रंगकर्मींना बसत असल्याने स्पर्धेसाठी इतर नाट्यगृहांचा विचार केला जाईल, अशी भूमिका संयोजकांनी घेतली. मात्र महापालिकेची इतर नाट्यगृहे यंदाही स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या प्रदीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा भरत नाट्य मंदिरमध्येच राज्य नाट्य स्पर्धा रंगणार आहे.
अल्प दरात तिकिटे उपलब्ध
सातत्याने आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून यातून अनेक महत्त्वाची नाटके आणि रंगकर्मी उदयास आले आहेत. या स्पर्धेची तिकिटे १५ रुपये आणि १० रुपये, अशा अतिशय अल्प दरात उपलब्ध असून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.
महाविद्यालयांचा प्रथमच सहभाग
हौशी मराठी राज्य स्पर्धेत यंदा प्रथमच महाविद्यालये सहभागी झाली आहेत. मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड आणि मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय ही दोन महाविद्यालये यंदाच्या स्पर्धेत सादरीकरण करतील.