हिंगोली : ‘‘माझे उच्च शिक्षण होऊनही नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा झाला का? मी हतबल होऊन जीवन संपवित आहे,’’ असे चिठ्ठीत लिहून घरात विजेच्या तारेला पकडून तरुणाने जीवन संपवले. बुधवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील अजरसोंडा येथे ही घटना घडली. आदिनाथ गोविंदराव राखोंडे (वय २७) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
अजरसोंडा येथील आदिनाथ राखोडे हा मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय होता. मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात त्याचा सहभाग असायचा. आता मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी त्याची भावना झाली होती. बुधवारी रात्री घरी कोणी नसताना त्याने खिशात चिठ्ठी ठेवून विजेच्या तारांना स्पर्श करून जीवन संपवले. काही वेळातच हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आदिनाथला तातडीने उपचारासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
वैद्यकीय अधिका-यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आदिनाथ याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.