30.8 C
Latur
Saturday, May 25, 2024
Homeक्रीडाअबब...हैदराबादच्या २० षटकांत २८७ धावा

अबब…हैदराबादच्या २० षटकांत २८७ धावा

इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आरसीबीचा नाणेफेकीचा कौल चुकलाच

बंगळूरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा बेक्कार धुलाई झाली. सनरायझर्स हैदराबादचा प्रत्येक फलंदाज चौकार-षटकारांशिवाय दुसरी कोणतीच बोली बोलत नव्हता आणि त्यामुळेव विराट कोहलीसह आरसीबीचे सर्व खेळाडू व चाहते हतबल झालेले दिसले. हेड व अभिषेक शर्मा यांनी ७.१ षटकांत फलकावर शतकी धावा चढवल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने ३९ चेंडूत शतक झळकावले. त्यानंतर हेनरिच क्लासेनने क्लास दाखवला. मुंबई इंडियन्सविरुद्ध याच पर्वात हैदराबादने २७७ धावा कुटून आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला होता. तो विक्रम आज त्यांनीच मोडला.

हेडने २० चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याला अभिषेकची दमदार साथ मिळाली. ९व्या षटकात अभिषेकने स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू टोलवला आणि फर्ग्युसनने तो टिपला. अभिषेक २२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर बाद झाला. या दोघांनी ४९ चेंडूंत १०८ धावा जोडल्या. हैदराबादच्या चौकार-षटकारांचा ओघ आटला नाही. त्यांनी हेनरिच क्लासेनला बढती देताना तिस-या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. ट्रॅव्हिस हेडचा पॉवर प्ले सुरूच राहिला आणि त्याने संघाला १० षटकांत १२८ धावांपर्यंत पोहोचवले.

हेडने ३९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि आयपीएल इतिहासातील हे चौथे वेगवान शतक ठरÞले. २०१३ मध्ये ख्रिस गेलने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध ३० चेंडूंत सेन्च्युरी ठोकली होती. त्यानंतर युसूफ पठाण ( ३७ चेंडू वि. मुंबई इंडियन्स, २०१०) व डेव्हिड मिलर ( ३८ चेंडू वि. आरसीबी, २०१३) यांचा क्रमांक येतो. ल्युकी फर्ग्युसनने त्याला माघारी पाठवले. हेड ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला. त्याची व क्लासेनची ५७ ( २६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. हेडच्या विकेटनंतर क्लासेनने हात मोकळे करत धावांचा तो वेग कायम राखला. त्याने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि हैदराबादला १५ षटकांत २०५ धावांपर्यंत नेले.

क्लासेनचा झंझावात १७ व्या षटकात फर्ग्युसनने संथ चेंडूवर रोखला. क्लासेन ३१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. यश दयालच्या फुलटॉसवर एडन मार्करम झेलबाद झाला, परंतु तो चेंडू नो बॉल ठरला. अब्दुल समदने १९व्या षटकात ४,४,६,६,४ असे फटके खेचून संघाला २६६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर मार्करानने फटकेबाजी करून २७७ धावांचा पल्ला ओलांडला व आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या पुन्हा आपल्या नावावर केली. आरसीबीच्या ल्युकी फर्ग्युसन ( ५२), रिसे टॉप्ली ( ६८), यश दयाल ( ५१) यांनीही ४ षटकांत पन्नासाहून अधिक धावा दिल्या.

एकाच पर्वात दोनवेळा अडिचशे पार धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. हैदराबादने २० षटकांत ३ बाद २८७ धावा चोपल्या. मार्कराम १७ चेंडूंत ३२ तर समद १० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR