कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित शालेय नोकरी घोटाळ्याच्या चौकशीशी संबंधित तपास एजन्सीच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि कागदपत्र सादर केली. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर बॅनर्जी म्हणाले की, त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि पश्चिम बंगालमधील कथित शालेय नोकरी घोटाळ्याच्या तपासात केंद्रीय एजन्सीला सहकार्य करण्यास मी सदैव तयार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तृणमूल नेते सकाळी ११.१० ईडी कार्यालयात पोहोचले आणि जवळपास एक तास थांबले. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली नाही. केंद्रीय एजन्सीच्या कार्यालयाबाहेर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी नेहमीच ईडीला तपासात सहकार्य केले आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. मला पुन्हा बोलावले गेले तर मी ईडीसमोर हजर होईन. मी सर्व आवश्यक कागदपत्रांसह माझे तपशीलवार उत्तर सादर केले आहे.
सरकारकडून ‘छळ’
पैसे घेऊन प्रश्न विचारणे’ या वादात अडकलेल्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ पुढे येत बॅनर्जी म्हणाले की, जो कोणी केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहे, त्याचे केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून ‘छळ’ केला जात आहे.