पॅरिस : फ्रान्स सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भपात करणे हा महिलांचा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला आहे. फ्रान्सच्या संविधानात असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असे करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे.
विशेष म्हणजे फ्रान्सच्या संसदेमध्ये या घटनात्मक तरतुदीला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला. संसदेच्या संयुक्त मतदानात खासदार आणि सिनेटर यांनी ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने या दुरुस्तीच्या बाजूने कौल दिला. फ्रान्समध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणा-या गटाने याचे स्वागत करत जल्लोष केला. तर, गर्भपाताला विरोध करणा-या गटाने कडाडून टीका केली.
फ्रान्सचे पंतप्रधान अटेल यांनी मतदानावेळी कायदेमंडळात सांगितले की, आम्हाला महिलांना संदेश द्यायचाय की, हे शरीर तुमचे आहे आणि त्याच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी तुमचा असेल. दरम्यान, अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये गर्भपात हा बेकायदा आहे. सध्या तेथे या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे.
फ्रान्समध्ये १९७४ पासून गर्भपात हे कायदेशीर आहे. पण, अमेरिकेमध्ये २०२२ मध्ये एका निर्णयात गर्भपाताचा अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये गर्भपाताला मूलभूत अधिकार करण्यासाठी चळवळ सुरु झाली. त्यानंतर सोमवारी कलम ३४ मध्ये दुरुस्ती करुन गर्भपात हा मूलभूत अधिकार करण्यात आला.