22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसंपादकीयबाभळीच्या झाडाला...!

बाभळीच्या झाडाला…!

आपल्या माय मराठीत ‘बाभळीच्या झाडाला आंबे कुठून येणार?’ असा एक वाक्प्रचार रूढ आहे. याचा अर्थ आपले जे कर्म तसेच आपले भविष्य घडणार असाच निघतो. तो किती तंतोतंत खरा आहे याची प्रचीती आपल्या शेजा-याची म्हणजे पाकिस्तानची आजची स्थिती पाहून येते. जन्मापासूनच भारतद्वेष हेच धोरण राबविणा-या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताशी थेट लढाईत आपला कधीच निभाव लागणार नाही हे कळून चुकल्याने दहशतवाद पेरण्याचे व जोपासण्याचेच धोरण सातत्याने राबविले. त्यात देशात सर्वशक्तिमान असणा-या पाकिस्तानच्या लष्कराने तेवढ्याच हिरीरीने सहभाग नोंदविला. या धोरणात पाकला काही काळ बरेच यशही आले व भारताला दहशतवादाची मोठी झळ सोसावी लागली. भारताने दहशतवादविरोधात कडक भूमिका घेऊनही आजही भारताला सोसावी लागणारी दहशतवादी कारवायांची झळ पूर्णपणे थांबलेली नाहीच. मात्र, आपल्या अंगणात बाभळीचे झाड लावले तर त्याचे काटे आपल्याच अंगणात पडणार व ते आपल्यालाही टोचणारच, हा निसर्गाचा नियमच! हा नियम आपण बदलू शकतो, असा फाजिल आत्मविश्वास पाकिस्तानच्या सर्वशक्तिमान लष्कराने व राज्यकर्त्यांनी बाळगला खरा पण आता त्याला सुरुंग लागला आहे. दहशतवाद्यांनी नुकताच मियांवाली येथील पाक हवाई दलाच्या तळावर हल्ला केला व हवाई दलाच्या विमानांचे मोठे नुकसान केले.

त्यात पाकचा एक सैनिकही ठार झाला. पाकिस्तानातील हंगामी सरकार व लष्कर आता हा दहशतवादी हल्ला हाणून पाडल्याचे व त्यात नऊ दहशतवादी ठार झाल्याचे सांगून भलेही पाठ थोपटून घेत आहे पण ज्या सर्वशक्तिमान पाक लष्कराने हे दहशतवादाचे काटेरी झाड लावले व पोसले त्यांच्याच दारात आता काटे पडायला व टोचायलाही सुरुवात झाली आहे, हाच या हल्ल्याचा अर्थ! सर्वशक्तिमान म्हणवून घेणा-या पाकिस्तान लष्कराला स्वत:वरचा दहशतवादी हल्ला थोपविता आला नाही, हेच सत्य! यातून पाक लष्करापेक्षा त्यांनीच पोसलेले दहशतवादी हे जास्त शक्तिशाली व शस्त्रसज्ज बनले आहेत हाच निष्कर्ष निघतो. अफगाणमधून घाईघाईने माघार घेताना अमेरिकी सैन्याने स्वयंचलित बंदुका, तोफा, तोफगोळे, रणगाडे, रॉकेटस्, छोटी क्षेपणास्त्रे, दारूगोळा अशी लष्करी सामग्री अफगाणमध्येच सोडून दिली. त्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी कब्जा मिळविला. पाकिस्तानी लष्करांपेक्षा हे अतिरेकी जास्त शस्त्रसज्ज बनले आहेत. त्याचाच परिणाम नजिकच्या काळात पाकिस्तानात वाढलेल्या हिंसाचारात व दहशतवादी हल्ल्यांच्या वाढलेल्या तीव्रतेत दिसतो आहे. गेल्या नऊ महिन्यांत पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११०० हून जास्त बळी गेले. विशेष म्हणजे त्यात ३८३ सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे.

मागच्या तीन महिन्यांत तर पाकमधील घातपाती कारवायांमध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते. यातील ९२ टक्के घातपात हे खैबर पख्तुनख्वाच्या अफगाण सीमेवर असणा-या भागात घडले. डेरा अली खान व ग्वादर येथे झालेल्या हल्ल्यात १७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर तेथेच झालेल्या चौथ्या हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले. मियांवली एअर बेस पंजाब प्रांतात आहे. डेरा अली खान खैबर पख्तूनख्वा प्रांतात तर ग्वादर बलुचिस्तान प्रांतात येते. याचाच अर्थ पाकिस्तानच्या चारपैकी तीन प्रांतात दहशतवादी डेरा टाकून आहेत. मियांवली हल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. ही संघटना तेहरिक-ए-तालिबान (टीटीपी) या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे. पाकिस्तानातील काही अत्यंत भीषण आत्मघातकी हल्ले टीटीपीने घडवून आणले आहेत व या संघटनेची निष्ठा कायमच अफगाणमधील तालिबान्यांशी राहिलेली आहे.

त्यामुळे खैबर पख्तूनख्वा किंवा अफगाण सीमेपलीकडे असणा-या टीटीपीच्या तळावर पाक लष्कराने हल्ले केले की, पाक लष्करी तळांना लक्ष्य करून टीटीपी त्याला तेवढेच चोख उत्तर देते. आज त्यामुळे पाकिस्तान सर्वच बाबतीत अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आर्थिक दिवाळखोरीने जनतेला महागाईच्या विस्फोटक झळा सोसाव्या लागतायत. राजकीय अराजक तर टिपेला पोहोचलेले आहेच. त्यात शक्तिमान मानल्या जाणा-या वा म्हणवून घेणा-या पाक लष्कराला त्यांनीच पोसलेला दहशतवाद थेट सशस्त्र आव्हान देतो आहे. चीननेही पाकमधील स्थिती ओळखून मदतीत हात आखडता घेतला आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाचे सामने पाहणे व आला दिवस ढकलणे एवढेच पाक नागरिकांच्या हाती राहिले आहे. त्यांचा ना राजकीय नेत्यांवर फारसा विश्वास राहिलाय ना पाकिस्तान लष्करावर! दहशतवाद्यांचे वारंवार होत असलेले हल्ले पाकच्या सर्वशक्तिमान लष्कराला थोपविता येत नाहीत, ही पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. शेजारच्या अफगाणमध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती पाकिस्तानात घडणार का? ही शंका त्यामुळे बळावत चालली आहे व तसे घडणे शेजारी म्हणून भारतासाठीही मोठी चिंता आहे. या अस्वस्थ शेजाराच्या झळा भारतालाच सर्वांत जास्त बसणार आहेत.

पाकिस्तानात लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणे व तेथील अराजकाची परिस्थिती नियंत्रणात येणे गरजेचे आहे. पाकिस्तानने अफगाण निर्वासितांना हुसकावून लावण्याची मोहीम सुरू केल्याने अफगाण-पाक दरम्यान तणाव वाढत चालला आहे. त्यातून भारतीय उपखंडात स्फोटक स्थिती निर्माण होऊ शकते. तसे घडल्यास त्याची सर्वांत जास्त झळ अर्थातच भारताला सोसावी लागणार आहे. दहशतवादी प्रबळ होणे हे पाकसाठी हाताने ओढवून घेतलेले आजारपण असले तरी ही बाब केवळ पाकच्याच नव्हे तर भारतासह जगातील अनेक देशांसाठी धोकादायकच ठरू शकते. त्यामुळे त्यावर आनंद व्यक्त करणे व ‘बरे झाले, मस्त जिरली’ असे समाधान मानणे परवडणारे नाही. अफगाणमध्ये अमेरिकेसारख्या महासत्तेलाही हात पोळवून घ्यावे लागल्याचा ताजा धडा आहेच. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे प्राबल्य कमी करण्यासाठी जगाला व भारताला यात हस्तक्षेप करावा लागेल. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना व धोरणकर्त्यांना दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सामील करून घ्यावे लागेल व या लढ्यासाठी त्यांना सज्ज करावे लागेल. पाकचे राज्यकर्ते वा लष्कर आपणहून हे करणे कठीणच! त्यामुळे भारताला अमेरिकेच्या मदतीने घडवून आणावे लागेल अन्यथा दहशतवादाचे हे काटे आपल्यालाही बोचतील, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR