नांदेड : प्रतिनिधी
कुंभमेळ्यात स्रान करून अयोध्याला दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा टेम्पो ट्रव्हल्स रस्त्याशेजारी थांबलेल्या बसवर आदळून भीषण अपघात झाला. रविवारी पहाटे बाराबंकी जिल्ह्यातील पुर्वांचल एक्स्प्रेस रस्त्यावर झालेल्या अपघातात नांदेड शहरातील ३ व वसमत येथील एक अशा ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत.
कुंभमेळा येथे स्रान करून नांदेडच्या भाविकांसह अन्य भाविक अयोध्या येथे राम मंदीराच्या दर्शनासाठी एका टेम्पो ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. रविवारी १६ फेबु्रवारी रोजी पहाटे ५:३० च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पुर्वांचल एक्स्प्रेस रस्त्यावर एका नादुरुस्त बसवर टेम्पो जाऊन आदळला.
या भीषण अपघातात नांदेड येथील सुनिल दिगंबर वरपडे वय ५०, अनुसया दिगंबर वरपडे वय ८०, दिपक गणेश गोदले स्वामी वय ४० सर्व रा. छत्रपती चौक नांदेड व जयश्री पुंडलीकराव चव्हाण वय ५० रा. अडगाव रंजेबुवा ता. वसमत जि. हिंगोली या चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.