प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेतील प्लॅटिनम खाणीत झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला असून ७५ कामगार जखमी झाले आहेत. राजधानी प्रिटोरियाच्या पश्चिमेला असलेल्या रुस्टेनबर्ग खाणीत सोमवारी हा अपघात झाला. खाण चालवणाऱ्या इम्पाला प्लॅटिनम या कंपनीने कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात दुःखद दिवस असल्याचे वर्णन केले आहे. रुस्टेनबर्ग खाणीतील खाणकाम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. प्लॅटिनम खाणीत लिफ्ट कोसळल्याने हा अपघात झाला आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात ८६ मजूर सामील होते. ७५ जखमींना परिसरातील चार वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्पाला प्लॅटिनम ही दक्षिण आफ्रिकेतील प्लॅटिनम उत्पादकांपैकी एक आहे जी जगातील सर्वात खोल आणि सर्वात जुन्या खाणी चालवते. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, खाणकाम तात्पुरते थांबवण्याचा निर्णय बुधवारपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
इम्पाला प्लॅटिनम होल्डिंग्ज (इम्प्लांट्स) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निको मुलर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात भयानक दिवस होता. या घटनेची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिका हा प्लॅटिनमचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.